मी प्रवासी, अखंड.

‘आज बोलणार आहे मी. किती दिवस हा आवाज दडपणार आहेस? जाणीव होऊनसुद्धा असं वागणं म्हणजे बेदखलपणा झाला हा.’

‘समजून घेत आहेस तू? अरे त्या कर्णानं इथे याच विलक्षण तन्मयतेने उपासना केली, मीरेने स्वतःला अर्पण केलं, तर शिवाजीने अशक्यात शक्य शोधलं. मी तिथेच पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, इंच इंच अंतर रोज काढत.’

‘खिजवायचं म्हणून नाही म्हणत, पण कुठे पोचला आहेस तू आजवर? इंच इंचाची गोष्ट करताना पुढे जातोयेस का मागे याचं तरी भान आहे ? आणि पोहोचायचय ते तरी कुठे? जाणून आहेस ना, अगणित अमर्याद ते गाठता यायचं नाही. कधीच. शक्यच नाही.’

‘शक्य आहे. कित्येक तरी संगीत उपासकांनी संगीतविद्येत शोधलंय त्याला. रामानुजन ने तर गणितात शोधलंय. विवेकानंदांनी ज्ञानात शोधलंय.’

‘कुठे शोधलय? कशावरून? आणि कुठपर्यंत? व्याख्या करता येतेय तुला, जिथे ‘पोहोचायचय’ त्याची?’

‘व्याख्या? करायलाच हवी का ती? ब्रह्मानंदी टाळी लागणे याचा अर्थ उमजतो? मला तिथे पोहोचायचय जिथे मी स्वतःला विद्येच्या उपासनेत, माझ्या स्वकर्मात, स्वतःला विसरून गुंग होऊ इच्छितो. आता ते नेमकं काय हे तिथवर पोहोचल्या शिवाय सांगणं अशक्य.’

‘प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात.’

‘मात्र मी मर्यादेपलीकडच्या प्रवासालाच लागू इच्छितो.’

‘कसं करणार आहेस ते मात्र? कसं समजेल आणि?’

‘खरंच फार कल्पना नाहीये, अजूनही. पण जे जे काही अगणित अमर्याद आहे ना, ते सगळं माझ्या विद्येची जोडत जाणार आहे मी. त्याचसोबत विद्येला ब्रम्हांडात एकरूप करत उपासना करत राहणार. बाकी समजायचा भाग. जर ह्या विद्येची व्याप्ती इतकी प्रचंड तर ती उमजायची, मोजायची गरज भासत नाही मला. तो एक फक्त अनुभव असेल अनुभव, अगणित आनंदाचा. आता तर माझा फक्त प्रवासच सुरू झालाय.’

‘नक्की शुद्धीवर आहेस ना, भान वगैरे हरपलं तर नाही ना?’

‘भान हरपायलाच हवंय. जाऊ दे मला. मी जाणार आहे. ह्याच वाटेवर.’

‘बरं. जा तर मग. उपासना कर. कधीच मागे वळून पाहू नकोस. आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस. ज्या क्षणी तुझा विश्वास बसेल की तुला माझ्या आवाजाची गरज नाही त्यावेळी तुला असणाऱ्या माझ्या आवाजाची गरज संपलेली असेल. किंबहुना तो क्षण आता आलाच आहे.’

‘हो.’

‘पण लक्षात ठेव. ध्येय अगणित अमर्याद म्हणून ध्यास सोडून न देता मर्यादेकडून अमर्यादा कडे जा. थेंबे थेंबे तळे साचे जाईल. विद्याप्राप्ति तीच ज्ञानप्राप्ती तीच ईश्वरप्राप्ती. आणि तीच स्वप्राप्ती. तिथे माझं अस्तित्व राहणार नाही; किंबहुना तुझंसुद्धा.’

Notes : Influenced by the trailer of an upcoming film ‘The disciple’, by Chaitanya Tamhane. This is a conversation between two contrasting sides of our mind, one which wants us to go forward and one which holds back because of potential risks. After watching the trailer, I kept wondering about the subject; how long and to what extent would we keep striving for excellence. Even after thinking of knowledge/ vidya as the ultimate goal, is there any end? If so, is it really the end?

लिहिण्यास कारण की

ती उभी होती. एकटीच. बस थांब्यावर तशीही फार गर्दी नसायचीच. त्यात आज बुधवार अन संध्याकाळची वेळ. तस बुधवारी निघणार नव्हतीच ती, पण म्हणता म्हणता जरा उशीरच झाला होता. घरातून पाय निघता ना निघणे अशी काहीशी परिस्थिती होती. एवढा सगळं पसारा आवरला, घर रिकामं केलं, तरीही तिला वाटत होतंच, काहीतरी नक्की राहिलं असणार, कुठेतरी काहीतरी विसरलं असणार. किंबहुना आशाच होती म्हणायची. निदान त्या निमित्ताने डोळं भरून पाहता आलं असता त्या घराला, परत एकदा, अन बुद्धिनेही त्या ओढीला दुजोरा दिला असता. ती अचानक अस्वथ झाली. तिसऱ्यांदा. श्रावणाच्या सरी पडाव्यात अन सारं गच्च चिंब व्हावं असे काहीस वाटत होतं आज. घरासारखं घर होतं ते, साधारणच व जगाच्या नकाशात जणूकाही कुठलाही स्थान नसणाऱ्या गावातलं, पण तिच्या मात्र प्रत्येक आठवणीत त्या घराचं अस्तित्व होतं. याच घरात आईला शेवटच्या घटका मोजताना पाहिलं होतं, त्यानंतर बाबाही कामानिमित्त याच घरातून बाहेर पडले ते कायमचेच. मळकट लुगडं नेसणाऱ्या प्रेमळ आजीनेही न्हाऊमाखू इथेच घातलं होतं व तिचे शेवटचे विधीही इथेच झाले होते. नाही म्हणायला आनंदी आठवणीही असंख्य होत्या. मात्र आज फक्त आठवणीच होत्या. ना ओसरीपाशी पहुडणारा मोत्या होता ना शेजारच्या घरातल्या कचाकचा भांडणाऱ्या जावा. विहिरीपाशी ना बायकापोरांचा कलकलाट होता ना पाऱ्यावरच्या जेष्ठांच्या निवांत गप्पा. दोन चार माणसं होती बिडीच्या दुकानापाशी, आपापल्या फोनवर मग्न. हाच तो फोन, आजीला नकोसा झाला होता शेवटी. बाबा म्हणायचे, येतंय ना फोनवर बोलता, मग एवढा खर्च करून गावाकडे येण्यात काय अर्थ आहे? आजी चरफडायची, ह्या फोनने तो काय घर पाहणार आहे, तुला पाहणार आहे, गावकऱ्यांशी बोलणार आहे का इथलं जगणं जगणार आहे? बाबा मात्र शेवटपर्यंत आलेच नाहीत. शेवटी तिनेही शांतपणे सांगितलं त्यांना, तुमचं तिच्याशी नातं फोनवरच, अंत्यसंस्कारही फोनवरच केलेत तर बरं होईल.

गावही फार बदललं होत अशात. सुरुवातीला गावातली आठ दहा पोरं जायची शहराकडे. काही वापस यायची, पण बरीचशी स्थायिक व्हायची. नंतर मात्र प्रत्येकालाच शहरी जायचं होत. झगमगाटाची दुनिया, स्वप्नवत वा स्वप्नाप्रमाणेच दिसत असली, तरी ओढून घेत होती. गावाकडलं मातीच टूमदार घर सोडून चार बाय सहाची खोली सर्वांना सामावून घेत होती. गावातला पैसा कमी झाल्याने बाकीच्या उद्योगधंद्यावरही पाणी फिरल होतं. ज्यांचं भागात होत ते सुखी होते. ज्यांना अजून हवं होतं व ज्यांना गरज होती ते शहराची वाट पकडत गेले.

तीही निघालीच होती की. निकटच्या शहरी येणं जाणं करत शिक्षण घेतलं होतं ते ह्या गावात काहीतरी नोकरी उद्योग करून भागवाव ह्या हेतूने. कापसाचं मुबलक पीक देणाऱ्या त्या गावात एका मोठ्या कंपनीने कारखाना घातला, व तिला मोठी नोकरी मिळाली. नोकरीसमवेत बरीच इतरही कामे करत ती समाधानी होत गेली. पण एकाएकी सारच फिस्कटलं. कंपनीचा तळ हलला व सक्तीची बदली आली. रात्रभर डोळे ताणून बसली होती ती त्या दिवशी. गाव सोडायच? इथलं वातावरण, घर, ओसरी, मंदिर, माणसं, नदी, इतकच नव्हे तर गुर, पक्षी, जमीन, पाण्याची देखील खूप सवय होती तिला. घराची प्रत्येक भिंत आपलीशी होती. प्रत्येक कोपऱ्यात आठवणी अलगद ठेवल्या होत्या. माळ्यावरच्या प्रत्येक वस्तुबरोबर एक कहाणी होती. स्वयंपाकघरातल्या डब्यात गाणी होती. आरशासमोर नखरे आणि पुस्तकांमध्ये भावना होत्या. जुन्या वस्तूंच्या पेटी मध्ये बालपण होतं. झरोक्यातून येणाऱ्या वाऱ्यांबरोबर आजीचा आवाज होता. तिची घालमेल सुरूच होती. कित्येकदा विचारल होतं स्वतः ला, खरंच जायची गरज आहे का, इथंच नाही का राहता येणार, स्वतःच जग अभाधित ठेवता येणार.

जळला मेला तो पैसा, आजी नेहमी म्हणायची, माझ्या गावाला या पैसा नामक रोगाची लागण झाली आहे म्हणायची. पैसा आधीही होता, पण मारामार नव्हती, फोन नव्हता, चढाओढ नव्हती व नसत्या विकासाचा हव्यास नव्हता. शिवाय परदेशी जाणं ही सोपं नव्हत. एक ना अनेक कारणं. गाव आधी सुखी होतं. ना डोळे दिपवणारी श्रीमंती ना फसवी चढाओढ. गोष्टीतलं गाव होतं. मग सारच चित्र पालटलं. बस येत होती. दाटलेला हुंदका आत सारण्याचा असफल प्रयत्न तिने केला. निरोपाची वेळ होती. सूर्यास्त ही नुकताच झाला होता. निरोपावरून आठवलं, तिने घरी अनेक ठिकाणी स्वतःच काहीतरी मागे ठेवलं होतं, त्या घरात राहणाऱ्या पुढच्या व्यक्तीसाठी संदेश ठेवले होते. खूप सांगायचं होतं त्या व्यक्तीला. खूप काही जपून ठेवायला हवं होतं. घराबद्दल, गावाबद्दल, आजीबद्दल. पण शेवटी काय आणि किती लिहिणार. निघताना दार, भिंतीपासून कवडसे सुद्धा निरखून पाहिले होते. मनात पक्के बसवले होते. संदेशांच्या व खुणाच्या जागा लक्षात ठेवल्या होत्या. शेवटी फक्त एक विचार चमकून गेला, हे सगळं ती विसरून तर नाही ना जाणार. हे सारे संदेश, आठवणी, पुढच्या व्यक्तीसाठी होते का फक्त नि फक्त तिच्यासाठी होते? घर, ओसरी, आजी, आठवणी हे सारं फक्त तिचं होतं ना? पण ती तर निघाली होती. मग ह्या सगळ्याच मोल होतं का नव्हतं, आणि कुणासाठी? गाव मागे सरत गेलं, तिची घालमेल व गुंतता वाढत गेली. पण या विचित्र प्रश्नाचा व स्वतःच्या भावना व वर्तणुकीचा शेवटपर्यंत थांगपत्ता लागला नाही.

किर्पेचं दान द्यावं जी!

आभाळाकडे टक लावून पाहत बसणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात अखेर इंद्रदेवाने पाणी घातलं. नेहमी उपेक्षाच नशिबी येणाऱ्या विदर्भ व मराठवाड्यात या वेळेस थोडा फार पाऊस आला. तरी येता येता उशीर झालाच. मग काय नेहमीचच. जुलै महिन्याभर एक एक दोन दोन दिवसाआड पाणी आलं. तेही आम्ही शहरातले, देशाच्या विकासात महत्त्वाचं योगदान देणारे, उच्च वस्त्यांमध्ये राहणारे म्हणून नळाला तरी आलं. बाकी शहरात कुठे मुनिसीपाल्टीच्या एखाद्या नळाला, कुठे फार कमी दबावात तर कुठे आलेच नाही. पाण्याला अक्षरशः अन्नाईतकी किंमत आली. शेतकरी सुरवातीचा हवामान अंदाज व तुरळक सरी पाहून आशा लावून बसला होता. पण पाऊस आलाच नाही. आता एक दोन दिवसात नाही आला तर शेतकरी फार दडपणाखाली येतील अशी वार्ता पसरली. डोळ्यासमोर त्या ओसाड कोरड्या व करपलेल्या जमिनीचे चित्र आले. जळगावच्या त्या शेतकऱ्यांची आठवण आली. ऑगस्ट मध्ये भरते हो विहीर, पण डिसेंबरच्या आधीच कोरडी पडते असा म्हणणारा शेतकऱ्यांचा तो केविलवाणा चेहरा आठवला. शेवटी तो आला. दहा बारा दिवस हळू हळू पडत राहिला. शहराकडे लोक वैतागत गेले, पण गाव अजूनही धाकधूकीत होतं.

इकडे चटका बसला असल्यामुळे व्हॉट्सऍप व फेसबुक वर पाण्याच्या योग्य अयोग्य वापराच्या चर्चाना पेव फुटलं होतं. किती निष्काळजीपणे पाणी वापरलं जातं याचा अगदी घरापासून प्रत्यय आला. कूलर मधील पाणी असो किंवा गाडीधुण्यास वापरलेलं. केवळ विहिरीच्या पाण्याला पैसे लागत नाहीत म्हणून अगदी सर्रास ते काढलं जातं. पाणी वाचवा याचा अर्थ फक्त बिल वाचवा असा होत नाही हे लोकांना स्पष्ट झाल्याचं वाटत नव्हत. अफाट वाढलेली शहरे, त्यात तुंबलेली गटारे व नाले, अस्वच्छ व अनियमित पाणीपूरवठा अशी एकूण नियोजन व्यवस्थाच कोलमडली होती. एकीकडे अनेक भागात भीषण पाणीटंचाई व दुसरीकडे कोल्हापूर सांगली सातारा मध्ये महापूर. अनेक परिवार उध्वस्त झाले. सांगलीला पाण्याने कवेत घेतलं तेव्हा वहिनीला कुसुमाग्रज यांच्या या प्रसिद्ध कवितेतील ओळी आठवल्या-

गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

मध्यंतरी अमेरिकेत शिकण्यास आले. इकडे चोवीस तास मुबलक पाणी, हिरवीगार वनराई, शेती व सुबत्ता दिसली. मक्याच भरपुर पीक घेणारी ओसाड पण समृध्द गावे पाहिली. प्लास्टिक सारखी एका लयीत कापलेली पीकं व लांबच लांब पसरलेले मळे पाहून भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेली कृषीप्रधान संस्कृती आठवली. जणूकाही अगदी स्पष्ट असा भेदभाव केल्याप्रमाणे आपले शेतकरी भोगत आहेत, असा विचार आला. सुपीक जमीन व मुबलक पाणी असूनसुद्धा अनेक शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. जलयुक्त शिवार योजना, कृषी संजीवनी प्रकल्प, उन्नत महाराष्ट्र अभियान अशा अनेक योजना कार्यरत असल्या तरी विशेष फरक पडलेला अजून दिसत नाही. वाटल, या वेळेस राहिलं तर राहिलं, निदान पुढल्या वर्षी तरी सर्वांना पाणी जपून वापरायची बुध्दी यावी व एकाही बापड्या शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येऊ नये एवढं देवाने किर्पेच दान तरी द्यावं!

वनवास

आज प्रकाश नारायण संत यांची एक गोष्ट वाचली. पुस्तकाचं व गोष्टीचं नाव वनवास. आज काहीतरी नवीन वाचून बघुया असा विचार करत सुधा मूर्ती, रवींद्रनाथ टागोर यांची पुस्तके बाजूला सारत अचानकपणे मी वनवास हाती घेतलं. मागे चक्क पुलंनी अभिनंदनास्पद मजकूर लिहिलेला. मग काय मी वाचायलाच घेतलं. पौगंडावस्थेतील लंपन नावाच्या मुलाच्या भावविश्वाची सफर घडवत धुंद करून टाकणारी ही गोष्ट. अगदी पुलंच्या भाषेत सांगायचं तर पौगंडदशा ओलांडताना यौवनाच्या सुगंधी झुळुका अंगावरून जाताना अस्वस्थ करून टाकणारा हा कालखंड. पुन्हा तो कालखंड मनसोक्त अनुभवण्यासाठी संत यांची उरलेली तिन्ही पुस्तके वाचण्याचं मी लगेच ठरवलं.

घर सोडायच्या आधी, म्हणजे IISER ला जाण्याआधी, मला आठवतं, एक काका भलीमोठी पुस्तकांची पिशवी घेऊन आमच्याकडे यायचे. सगळी मराठी असायची आणि तीसुद्धा जुनी, नवी, कवितासंग्रह, अनुवादित, वगैरे वगैरे. म्हातारेशे होते ते, अन् रात्री नेमके जेवायच्या वेळेला, थकलेले भागलेले, बऱ्याच दूर असलेल्या व ते काम करत असलेल्या दुकानातून ते यायचे. आल्या आल्या ते त्यांची पोतडी उघडायचे, जमिनीवर बसून पुस्तकांचा गठ्ठा बाहेर काढायचे आणि आम्हाला एक एक पुस्तकाबद्दल सांगायचे. अनेकदा मी ती वाचली असायची आणि मग ते नवीन, चाकोरीबाहेरच्या साहित्याची आम्हाला ओळख करून द्यायचे. असच एकदा त्यांनी प्रकाश नारायण संताची पुस्तके दाखवली. साधारण आठ वर्षांपूर्वी. संताच्या कार्याचा आढावा देत त्यांनी ती चार पुस्तके माझ्या हाती सोपवली. इतर काही घेण्यास नसल्याने व नाही म्हणण्यास योग्य कारण नसल्याने आम्ही ती पुस्तके घेतली व मी ती कपाटात नेऊन घातली.

घरातल्या आमच्या पुस्तकांच्या कपाटाला आम्ही लायब्ररी म्हणायचो. अधूनमधून मला ते संपूर्णपणे आवरायची हुक्की यायची. काहीच दिवसांत ती पूर्वपदाला यायची. अशीच एकदा आवरल्यानंतरची आमची लायब्ररी-

लायब्ररीतील मराठी दिग्गज लेखनकारांची, जसे शिवाजी सावंत, रणजित देसाई, पू लं, व पू, मिरासदार यांची अनेक पुस्तके मी मोठ्यांची म्हणून वाचली होती, पण नवीन मराठी लेखनाचा पायपुसही नव्हता. खरंतर इंग्रजी प्रभावाखाली अनेक नव्या दर्जेदार मराठी लेखनाला फार उजेड सापडलाच नाही. असो, तर एकदा ती पुस्तके मी जी आत टाकली, ती आजतागायत कोणीच बाहेर काढली नव्हती. मी घराबाहेर पडले आणि त्या काकांना गेल्या आठ वर्षांत मी पाहिलेलं नाही. मी आणि दादा बाहेर निघाल्यावर आईचं सुद्धा कामानिमित्त बाहेरगावी जाणं वाढलं आणि हळूहळू काकांचं घरी येणं थांबलं. लहानपणी प्रत्येक वेळेस काका आल्यावर मला वाईट वाटायचं. नागपुरात माझ्या वयाचे म्हणा, किंवा इतरही किती लोकं मराठी वाचतात याची पुरेशी कल्पना होती मला. नंतर आमचंही घर सुटलंच होतं त्या पगडीतून. मराठी जगली पाहिजे, समृद्ध झाली पाहिजे असा अ्टाहास ठेवत उत्साहाने मराठी जग घेऊन फिरणारे किती बरं लोक असतील अजून? त्यात अशात एकेकाळी मराठी वाचनालयांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या ठाणे व पुणे येथील दुष्काळाने अवकळा आलेल्या वाचनालयांबद्दलची बातमी वाचली आणि पोटात खड्डाच पडला. इंग्रजीमुळे वनवास नशिबी आल्यामुळे माझ्या प्रिय मराठी शाळेची सुध्दा काहीशी अशीच अवस्था झालेली. असो.

वनवास मध्ये पावसाळ्यातल्या मातीचा वास आहे, रंगीबेरंगी सूर्यास्त आहे, गावाकडल्या कष्टकऱ्यांचा गप्पा व बैलांच्या घुंगरांचे आवाज आहेत, झाडाच्या पारंब्या, टवाळ मित्रमंडळ आहे आणि मुख्य म्हणजे मुक्त आणि सोपे जीवन आहे. यातले खूपसे माझ्या लहानपणातच शोधता येतं, नाहीतर सहजपणे समजता तरी येतं. हे सर्व मला पाश्चिमात्य कथेत नाहीच सापडत. आपली संस्कृती ही जी संकल्पना आहे ती याच कारणामुळे मला मधुर वाटते, जे स्वतःचे, जसे आहे ते तसेच मान्य करणे, अभिमान म्हणण्यापेक्षा जीवनशैलीत आपलेसे करणे. आणि हे सर्व फार सहजपणे. म्हणूनच लहानपणापासून मराठी वातावरणात असल्यामुळे मला बऱ्याच टीव्ही सीरिज, सिनेमा यांच्याशी नाहीच कनेक्ट करता येत. वनवास वाचल्यानंतर हे प्रकर्षाने जाणवलं. लंपनला तर अनेक वर्षांपासून ओळखतेय असं वाटत गेलं. संस्कृती व ती जोपासण्यात असलेले साहित्याचे महत्त्व पटले. त्याचप्रमाणे सध्याच्या कृत्रिम जगात हक्काचा वनवास हवासा वाटला. पडद्यावरच्या निसर्गाच्या आत जावसं वाटलं आणि पडद्यापासून खूप खूप दूर.